साहित्य – १० ते १२ बकऱ्याचे पाय, काळा मसाला, हळद , काळेमिरी , लवंगा, डालचिनी, भाजलेलं सुखं खोबरं, चार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले लसणाची पेस्ट, ४ चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती – सर्व पायांचे २-२ तुकडे करून घ्यावे. आता सर्व पाय पाण्यात बुडतील एवढे पाणी घेऊन त्यांना किमान ३ ते ३.३० तास माध्यम आचेवर ठेवून पाय संपूर्णपणे उकळून उकळून त्यांचा कस काढून घ्यायचा. मांस हाडांपासून वेगळे झाले पाहिजे. ( टीप – जर आपल्याला झटपट शिजवून हवे असल्यास पाय कुकरमध्ये शिजण्याकरिता ठेवावे आणि किमान १० शिट्या घ्याव्यात ). पायाच्या रस्स्यासाठी लागणारे वाटण तयार करून घ्यावे. वाटणासाठी मी येथे एक वाटी कोथिंबीर, एक वाटी भाजलेलं सुखं खोबरं, १० काळेमिरी, ७ ते ८ लवंगा, २ डालचीनीचे छोटे तुकडे आणि ४ हिरव्या मिरच्या घ्याव्यात. ( या रस्स्यामध्ये काळेमिरी, लवंग आणि डालचिनी या तीन सामग्रीचा फ्लेव्हर्स जास्त असतो ). ३. ३० तासानंतर पाय मस्त उकळून त्यातून कस, चिकट स्त्राव आणि हाडांपासून मांस देखील वेगळे झालेले आपणास दिसेल. भांड्यामधून पाय आणि स्टॉक वेगळे करून घ्यावेत. कढईत ४ चमचे तेल टाकावे आणि तापवून घ्यावेत. ( ४ चमच्यापेक्षा जास्त टाकू नये कारण पायांच्या हाडांपासून देखील बरेच तेल सुटलेले असते.) तेल तापल्यावर त्यात २ मोठे चमचे आले लसणाची पेस्ट टाकावीत. पेस्ट टाकल्यावर ती तेलात चांगली परतवून घ्यावी. पेस्ट परतवून झाल्यानंतर त्यात एक चमचा हळद टाकावी. २ मोठे चमचे काळा मसाला टाकावा. मसाला आले लसणाच्या पेस्ट मध्ये चांगला परतवून घ्यावा. मसाला परतवून झाल्यावर त्यात तयार केलेले आपले वाटण टाकावे. वाटणाला तेल सुटे पर्यंत सतत ते मसाल्यात परतत रहा. आता आपल्या सर्व मसाल्यांतून तेल बाजूला सुटून चांगला ताव निघालेला दिसेल. यात आता शिजलेले पाय सोडावे. सर्व पाय मसाल्यात चांगले घोळून ५ मिनिटे परतत रहा. आता यात पायापासून तयार केलेला स्टॉक हळूहळू टाका. स्टॉक टाकल्यावर सर्व मसाल्यातून निघालेला ताव वर आलेला दिसेल म्हणजेच आपले मसाले चांगले भाजले आहेत असे समजावे. आता पायाच्या रस्याला चांगली १० मिनिटे उकळ काढावी. रस्याला चांगली उकळ आल्यावर त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि एक उकल काढून गॅस बंद करावा. आता आपला स्पेशल झणझणीत पाया रस्सा तयार झाला आहे. हा रस्सा आपण वाफाळत्या भाता सोबत किंव्हा गरमागरम भाकरी सोबत खाऊ शकता.
0 comments:
Post a Comment