AURANGABAD FOODIE

प्रॉन्स कॅलडिन

0

साहित्यः
मोठी कोलंबी : ५०० ग्रॅम्स.
आलं : १ इंचं.
लसूण : ८ पाकळ्या.
ह्ळद : १/२ लहान चमचा (टि स्पून).
तिखट : १ लहान चमचा (किंवा आवडीनुसार जास्त).
हिरव्या मिरच्या : ३ नग. आख्या, उभी चीर देऊन.
कांदा : १ मध्यम.
टोमॅटो : १ मध्यम.
कढीलिंब : १७ ते १८ पानं.
नारळाचे तेल : अर्धी वाटी.(नारळाचे तेल आवडत नसल्यास कुठलेही आवडीचे खाद्यतेल घ्यावे).
जीरं : १ मोठा चमचा (टेबल स्पून)
नारळ : १ नग
मीठ : चवीनुसार.
तयारी:
कोलंबी स्वच्छ करून त्यातील काळा धागा काढून टाका. कोलंबीला हळद-मीठ लावून ठेवा.
आलं+लसूण वाटून घ्या.
कांदा टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या.
कढीलिंब धुवून घ्या.
नारळ खवून त्याचे जाड आणि पातळ दूध काढा. (नारळ आणि दिड ग्लास कोमट पाणी घालून मिक्सर मध्ये भरपूर वाटून, हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या. हे झाले जाड दूध . आता तोच नारळाचा चोथा मिक्सरमध्ये घालून अर्धा ग्लास कोमट पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या हे झाले पातळ दूध. जाड आणि पातळ दूध वेगवेगळे ठेवा.)
कृती:
कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवा.
तेल तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की कढीलिंब आणि हिरव्या मिरच्या घाला.
कढीलिंबाचा वास आणि मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरला की बारीक चिरलेला कांदा टाकून परता.
कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की टोमॅटो घालून परता.
टोमॅटो शिजून कांद्याशी एकजीव झाला की कोलंबी आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता.
आंच मंद करून, कोलंबी बुडतील इतके (जरा कमीच) नारळाचे पातळ दूध घाला. सर्व मिसळून घ्या.
कोलंबी लवकर शिजते. ती शिजली की नारळाचे जाड दूध घाला.
जाड दूध घातल्यावर उकळू नका. रस्सा साधारण चांगला गरम झाला की गॅस बंद करा.
हे कालवण गरम भात किंवा अप्पम बरोबर, केल्यादिवशी, चांगले लागतेच पण दूसर्‍या दिवशी अधिक मुरते. फक्त दूसर्‍या दिवशी फ्रिझ मधून काढल्यावर गॅसवर किंवा मायक्रेवेव्ह मध्ये हलके गरम करावे. उकळू नये नाहीतर नारळाचे दूध फाटते.

0 comments:

Post a Comment

/>