AURANGABAD FOODIE

स्पेशल झणझणीत सुख्खा मटण

0


साहित्य – एक किलो ताजे मटण, ४ चमचे घरगुती मसाला, एक चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, कुटलेलं ( क्रश ) मिरची आलं आणि लसुन, भाजलेल्या सुख्या खोबऱ्याची पेस्ट, एक अख्खा लसुन (लसुन हा पर्यायी आहे.) चवी नुसार मीठ आणि ४ मोठे चमचे तेल. ( या रेसीपी मध्ये कांदा आणि टोम्याटो चा वापर नाही आहे )
कृती – आता एका मोठ्या पातेल्यात ४ चमचे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात कुटलेला आलं लसुन आणि मिरची टाकायचं आहे. या ठिकाणी मी कुटलेला आले लसुन या करिता वापरत आहे कि सुख्या मटणात ते दाता खाली आल्यावर जास्त मजेशीर वाटते. आपल्याला या ठिकाणी पेस्ट वापरायची असेल तर तसं हि करू शकता. आता आले लसुन आणि मिरची मस्त तेलात खरपूस तांबूस रंग येई पर्यंत भाजायची आहे. सर्व मिश्रण तांबूस रंगा पर्यंत झाल्यावर
त्यात साधारण १ चमचा हळद टाकायची नंतर त्यात ४ चमचे घरगुती  मसाला टाकायचा. मसाले १ मिनिट तेलात परतून घ्यायचे. सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात मटणाचे तुकडे टाकायचे आहेत. आता मटण सर्व मसाल्यात एकजीव करायचे. मटण चांगले 

एकजीव झाल्यावर मटणाला थोडे पाणी सुटेल. नंतर पातेल्यावर झाकण ठेवून त्यात थोडे पाणी गरम करण्यास ठेवायचे. लक्षात ठेवा जर मटण एकदमच सुखे झाले असेल तरच हे झाकणा वरील पाणी आपण मटणात सोडणार आहोत. आवश्यकता नसल्यास टाकू नये कारण मटण शिजत असताना त्यातून देखील पाणी सुटते आणि आपल्याला हे मटण सुखे बनवायचे आहे. मसाला मिक्स करण्यासाठी पाणी टाकायचे असल्यास मी पुढील प्रक्रियेत पाणी कधी टाकायचे ते नमूद केले आहे. या रेसिपी मध्ये थंड पाण्याचा वापर टाळावा. संपूर्ण मटण मंद आचेवर ठेवून वाफेवरच शिजवायचे आहे. साधारण ५ मिनिटा नंतर मटण चांगले परतून घ्यावे. मटण परतून झाल्यावर पुन्हा वर झाकण ठेवून मटण वाफेवर शिजविण्यास ठेवावे. ५ मिनिटा नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वाफाळत्या मटणात सोडावी. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. साधारण २ मिनिटे पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढावी. नंतर त्यात अख्खा लसुन टाकावा. अख्खा लसुन हा पर्यायी आहे, जर तुम्हाला लसुन आवडत नसेल तर टाकला नाही तरी चालेल. पण मटणातला लसुन नुसता खायला खूपच चांगला वाटतो. आता लसुन मटणा मध्ये चांगला मुरवून घ्यावा. नंतर त्यात भाजलेल्या सुख्या खोबऱ्याची पेस्ट टाकावी. भाजलेल्या सुख्या खोबर्याच्या उरलेल्या वाटीत थोडे पाणी टाकून एकूण सर्व पेस्ट आपण वापरणार आहोत. कोणतीही सामग्री वाया जावू देवू नका. आता या नंतर पाणी टाकणार नाही आहोत. नंतर आपल्या चवी नुसार मीठ टाकावे आणि संपूर्ण मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या. आता आपली सुख्या खोबऱ्याची पेस्ट, नंतर त्यात टाकलेलं पाणी आणि मीठ या सर्व मिश्रणाला १५ मिनिटे झाकण उघडे ठेवून शिजवून घ्यावे. शिजत असताना मध्ये मध्ये परतून घ्यावे. १५ मिनिटांनंतर ग्यास बंद करावा. लाल तर्री वाला घट्ट अस्सल गावरान पद्धतीतलं गटारी स्पेशल सुखं मटण तयार आहे.

0 comments:

Post a Comment

/>